Skip to main content

एक 'गुलाबजाम' मुरलेला

भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड  राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा.

कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही,  कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याला जन्म देण्याची.

'गुलाबजाम' मध्ये येतात पुण्याची 'खास पुणेरी' माणसं, खास हरवत चाललेली महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती, पानं वाढण्यापासून ते अन्न हे पूर्णब्रह्म पर्यंत, माणुसकी मैत्री, विश्वास असे अनेक पैलू.

काही विपरीत घटनांमुळे काही लोक जगापासून तूटतात. आपल्याच जगात जगतात. कोषातून बाहेर पडणे त्यांना जमणार नसतं असं नाही, पण आपल्या भोवतीचं जाळं ते स्वतःच अधिक अधिक जास्त गुंफत जातात. पण कुठे ना कुठे एक आशेचा किरण असतो, सुटकेला वाव असतो, प्रगतीचा मार्ग असतो. या सिनेमात तो मार्ग आहे, स्वयंपाक. ही कला ही आहे, आणि शास्त्र ही.

आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना कुठलीही गाईड बुक्स नसतात. पाककलेचं, किंवा पाकशास्त्रचंही तसंच आहे. पाव इंच आलं आणि 4 थेंब लिंबू रस अशा नियमांनी बनवायला गेला तर कधीच जमायचा नाही. तुम्हाला घटक कळतील, कृती कळेल पण चव नाही. ती निव्वळ अनुभवावीच लागते. अमुक असा दरवळ सुटतो या पदार्थाचा हे कदापि लिहिता येणार नाही की वाचून उलगडा होणार नाही.

चित्रपटाची कथा, पटकथा छान, संवाद ही खुसखुशीत आणि हृदयस्पर्शी. संगीत साजेसं आणि सिनेमॅटोग्राफी अत्यंत सुंदर. फूड डिजायनिंगवर सायली राजाध्यक्ष यांनी कमालीची मेहनत घेतली आहे. सिद्धार्थने 'झेंडा' नंतर याच सिनेमात इतक्या सहजतेने भूमिका निभावली आहे. सोनाली कुलकर्णीच्या मला वाटतं सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक आहे. (इतक्यातच आलेला कच्चा लिंबू मला पाहता नाही आला त्यामुळे यातलंच म्हणता येईल).

मला यातील वेगवेगळ्या रुपकांची खूप मजा आली (कुंडलकर स्टाईल), स्वयंपाकाचा हेतू फक्त 'उदरभरण नोहे' हे सांगणारा असा हा सिनेमा. गुलाबजामसारखा पाकात मस्त मुरलेला. तो गुलाबजाम खावा तसा चवीचवीने बघा. तुम्ही किती पाकात आहात हे कदाचित कळेल (मला तरी कळलं).

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ