Skip to main content

"आम्ही दोघी - एक धागा विणलेला"

काल 'आम्ही दोघी' पाहिला. गौरी देशपांडें च्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर बेतलेला हा सिनेमा. दिग्दर्शिक प्रतिमा जोशी यांनी कथेवर सुंदर काम करून चित्रपट बनवला आहे. संवाद जास्त करून कथेतलेच असल्यामुळे भाग्यश्री जाधवला फारसे काही करावे लागलेच नाही असं म्हणणं गैर ठरेल. मूळ कथेत नसलेली पात्रे राम, नेहा व तिचा नवरा या कथेत अगदी सहज सामावून गेलेली आहेत. त्यांचे किंवा अम्मीचे शेवटचे संवाद कॅची, थोडके आणि तरीही हृदयस्पर्शी. 

कोल्हापुरातील एक नामांकित वकील (किरण करमरकर) यांची मुलगी सावित्री सरदेसाई (प्रिया बापट). तिची आई लहानपणीच गेल्यामुळे, अप्पा (वडील) आणि घरातील नोकरचाकर यांच्या देखरेखी झालीच वाढलेली. 

लहनपणापासून घरात "We are not emotional fools. We are practical." हे तिच्या वडिलांचं तत्व तिनेही जपलेलं. त्यामुळे काहीशी फटकळ, तुसडी किंवा चांगल्या शब्दात म्हणायचं तर 'अतिस्पष्ट'. इतर मुलींपेक्षा वेगळी सावित्री. 

10वीत असताना अचानक एके दिवशी तिचे वडील तिच्यातून 7-8 वर्षांहून मोठ्या अमलाला (मुक्ता बर्वे) लग्न करून घरी घेऊन येतात. वरवर "मला काय करायचंय" असं दाखवत असलेल्या सावित्री असंख्य प्रश्नांनी ग्रासून आतून हललेली असते. मग हळूहळू घरातली नोकरचकरांच्या गरड्यातली अजून एक व्यक्ती - ते 'सावत्र' आई - ते मैत्रीण अशा स्थित्यंतरातून जाता-जाता एक आगळं-वेगळं त्यांच्यात निर्माण होतं. अशी ही सावित्रीने सांगितलेली तिची आणि अम्मी ची कथा. 

वरून स्ट्रॉंग आणि फटकळ असली तरी आतून हळवी, सतत स्वतःलाच आपण इमोशनल फूल नसल्याचा दाखला द्यायच्या नादात असणारी सावित्री प्रिया बापटने उत्कृष्ट साकारली आहे. सगळ्या बंधनांना झुगारून देणारी सावी. कुठेतरी भावनांच्या कपाटाला कुलूपबंद करून त्यांचं ओझं बाळगणारी सावी. शाळेपासून पोस्ट डॉक्टरल रिसर्च पर्यंतचा कालखंड आणि बेफिकीर, बिनधास्त, बंडखोर सावित्री तिने खूप सहजतेने उभी केली आहे. 

पण साऱ्या चित्रपटात बाजी मारली आहे ती मुक्ता बर्वेच्या 'अमलाने'. केवळ अक्षर ओळख असण्यापूरतीच शिकलेली, खेडवळ, मितभाषी, मृदू अमलाचं पात्र तिने इतक्या सुंदर साकारलं आहे त्याला तोड नाही. नवरा (किरण करमरकर) आणि मुलगी सावित्री या दोघांच्या अहंभावाने ताणलेल्या नात्यात पिचली लेली, इंग्रजी बोलणाऱ्या, साजऱ्या, हुशार मुलीचं कौतुक असलेली, 'सावत्र आई' पासून 'अम्मी' झालेली अमला. इतके कमी सीन्स आणि संवाद आहेत तिचे, पण तिच्या देहबोलीने ती तिची भूमिका अक्षरशः जगली आहे. गावंढळ असली तरी नात्यांचं, आयुष्याचं गुंतागुंतीचं तत्वज्ञान ती मोजक्या शब्दात सावीला सांगून जाते. लोकर घेवून विणत बसलेली अम्मी सावीशी न कळणारं नातंही विणते.

"कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे, का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे" या गाण्यासारखेच आपण या सर्वांसोबत चालत राहतो. 

या दोघींसारखी सारीच पात्रं एकमेकाला पूरक, वास्तवतेला धरून आणि रंगीत छटांची आहेत.
त्यांचं प्रयोजन कळण्यासाठी 'आम्ही दोघी' पहावा लागेल..

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ