Skip to main content

उदरभरण नोहे..


"आई आज डब्यात काय ए?", दप्तर भरता भरता पिकलपोनीने विचारलं. "फरसबी आहे.. आणि डबा संपवला नाही ना पिकू तर मग बघ च."आई डबे भरता, भरता ओरडली. 'फरसबी' ऐकलं मात्र आणि पिकलपोनीने तोंड वेंगाडलं. "ए काय गं आई, तुला माहितीये ना मला नाय आवडत ना शेंगभाज्या, ", "अन्नाला असं घालून पाडून बोलू नये, लोकं मरतात अन्नावाचून, आपल्याला ते मिळतंय तर त्याचा मान राखा" असं म्हणत आईने दादू आणि पिकलपोनी कडे डबे सोपवले. "पिकू, तुला नेमकी कोणती भाजी आवडते गं? रोज तीच कटकट, डबा तसाच परत", दादुने मध्ये नाक घुसवलंच. पिकू चिडली. नाश्त्याला केलेले दडपे पोहे दडपायचेही त्या रागाच्या भरात राहून गेलं. दादू मज्जेत नाश्ता करत बसला. त्याला जीभ दाखवत पिकू शाळेसाठी निघाली. शाळेत पहिल्याच तासाला पिकूला भूक लागली. पण मधल्या सुट्टीला अजून होता वेळ. मधल्या सुट्टीपर्यंत कशीबशी भूक रोखून धरली. आणि एकदाची घंटा वाजताच उघडला डबा. पुन्हा डब्यात फरसबी बघून पिकूने डबा बंद केला. तिला पुन्हा राग आला. ''ही आई असं का करते? नाही आवडत मला भाजी तर मग दुसरं काही का नाही देत?", झोपीच्या डब्यात काहीतरी मस्त असेल, चला बघूया, असं म्हणत ती झोपीजवळ आली तर तिच्या डब्यात शेपू. शेपूचा वास येता क्षणी पिकलपोनीने पीछे मूड केलं आणि गेली आपल्या बेंचवर परत.
सुट्टी संपून गेली, आणि भूक मात्र अजून खवळली. शाळा सुटल्याबरोब्बर ती घरी जायला पळत निघाली. घरी पोहोचते तर बघते काय, घराला कुलूप. आई-बाबा अजून आलेले दिसत नव्हते. जेनी आंटींच्या घरातून काहीतरी बेक केल्याचा खमंग वास येत होता. दादू आला तो पुरचुंडीतून खारे दाणे खात खात. "मला दे दादू, पिकू अजीजी करत म्हणाली. "अगं, तुला शेंग भाज्या आवडत नाहीत असं सकाळीच तर ओरडत होतीस. दाणे शेंगेतच असतात. तुला नकोत ते. तिला चिडवत दादू दाणे नाचवत, खात खात म्हणाला.
एक तर भुकेने कासावीस जीव, त्यात दादू डोकं फिरवतो म्हंटल्यावर पिकूचा Travel to वैतागवाडी सुरु झाला. आई-बाबा आले, पण "मला भूक लागली" असं म्हणून हार कशी मानायची? अशा विचारात पिकू असताना बाबा म्हणाले दादू, पिकू चला फिरायला जाऊया. क्षणार्धात न खुलणारी कळी खुलली. आणि शहाण्यासारखी पिकू गाडीत जाऊन बसली. बाबांनी सहज गावातून एक फेरफटका मारून येऊ असं म्हणून नदी जवळच्या मंदिराशी गाडी आणली. बाहेर एके ठिकाणी अन्नाचा ढेर साठला होता. आजारी, वृद्ध, आणि लहान लहान मुलांची गर्दी जमली होती. थोडं-थोडकं का होईना पदरात पडावं म्हणून सगळ्यांची लगबग चालली होती. सगळ्यांच्या डोळ्यात भूक दिसत होती, पोट खपाटीला गेलेलं आणि अंग अगदी कृश झालेली अशी ती मंडळी.. "बरं का दादू, हे लोक त्यांना अन्न मिळत नाही म्हणून मिळेल तिथे मिळेल ते खातात. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी 'अन्न' एक आहे ना, ती सुद्धा काही लोकांची सहजासहजी पूर्ण होत नाही" बाबा सांगत होते..पिकू त्या सगळ्यांची दयनीय अवस्था बघून स्वतःची भूक विसरली. "आज आपण एक दिवस काही नाही खाल्लं तर आपली ही अवस्था झाली आणि ही सारी मंडळी तर सतत अन्नाला पारखी. हे सारे मिळेल ते खात आहेत. गरम-गार, गोड-तिखट, शिळं-ताजं काहीही न बघता. आणि आपल्याला पोट भरून जेवण मिळतं, आई पोषण देणारं अन्न देते, आणि आपण ते नाकारून त्याचा अपमान करतो, हे काही बरोबर नाही" ते काही नाही आता आपण अन्नाचा कधीही अपमान करणार नाही, आई जे बनवेल ते खाणार पिकलपोनीने मनोमन ठरवलं.
घरी येताच ती आईला बिलगली, "आई सॉरी. मी आता कधीच डबा न खाता आणणार नाही. अन्नाचा मान ठेवेन.", पटकन दप्तरातून डबा काढून पिकूने तो डबा संपवला. भूक भागली, मनही तृप्त झालं. आई नेहमी म्हणते ना, "अन्नाला भजून खावं ", ते आज तिने आचरणात आणलं होतं. आणि आज अन्न म्हणजे केवळ "उदरभरण नोहे जाणी हे पिकलपोनी"..हे ती शिकली म्हणून आईबाबा पण आनंदी झाले.
-रमा  
(Photo Courtesy - Google)

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ